बहुजननामा ऑनलाइन टीम –भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्ताने अग्निशमन सेवेतील वैशिष्ट्य पूर्ण सेवा या साठीचे राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना जाहीर झाले आहे. सन 2021 या वर्षासाठी अग्निशमन सेवा वैशिष्ट्य पूर्ण सेवेसाठी पुरस्कार प्राप्त करणारे देवेंद्र पोटफोडे हे महाराष्ट्रातील एकमेव अग्निशमन अधिकारी आहेत. यापूर्वी सन 2011 मध्ये त्यांना गुणवत्ता पूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.
वेंद्र प्रभाकर पोटफोडे यांचा अग्निशमन सेवेत 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून अग्निशमनातील अभियांत्रिकी पदविका सुवर्णपदकाचे मानकरी ठरून प्राप्त केली. अग्निशमन क्षेत्रातील विविध यंत्रणा, उपकरणे व पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्याकरता अमेरिका, जर्मनी ,ऑस्ट्रिया ,जपान, फ्रान्स, इंग्लंड यासारख्या प्रगत राष्ट्रांच्या अग्निशमन सेवानां त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. 2006 ते 2008 या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून अनेक लोकोपयोगी व जनजागृतीपर उपाय योजना केल्या होत्या. नुकत्याच सिरम इन्स्टिटयूट येथील आगीच्या दुर्घटनेत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाची सर्वांनीच प्रशंसा केली आहे.
लिडींग फायरमन राजाराम केदारी यांना राष्ट्रपती पदक
लिडींग फायरमन राजाराम केदारी यांना उत्कृष्ट कामगिरी करीता गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक जाहिर झाले आहे. केदारी हे 1987 रोजी फायरमन या पदावर पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल झाले. आगीच्या घटना, घरपडी, झाडपडी, रस्ते अपघात अशा विविध प्रकारच्या वर्द्यांवर काम करताना या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची अत्यंत धाडसाने जलद सुटका करणे, नागरिकांचे संरक्षण अशा अनेक कामगिऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.