Pune News : पेट्रोल पुण्यात 94 पार !

Petrol
February 11, 2021

बहुजननामा ऑनलाइन टीम –  पुणे : पेट्रोल डिझेलचे दर लवकरच शंभरी गाठणार असे म्हटले जात असतानाच गुरुवारी पुण्यात पेट्रोलने ९४ रुपयांचा आकडा पार केला.
पुण्यात आज पेट्रोलच्या किंमतीत तब्बल ३३ पैशांची वाढ होऊन ते ९४ रुपये लिटर झाले आहे.
डिझेलमध्येही ३१ पैशांची वाढ होऊन डिझेल ८३.३१ रुपये प्रति लिटर झाले आहे.
इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिकांबरोबरच व्यावसायिकही हैराण झाले आहेत. फरसाण, मिठाई यासारखे पदार्थ बनविणार्‍या व्यावसायिकांकडे प्रामुख्याने डिझेल शेगडी वापरली जाते. डिझेल स्वस्त असल्याने यापूर्वी त्यांना व्यावसायिकात स्पर्धात्मक दर ठेवणे परवडत होते. पण आता डिझेलचे दर पेट्रोलच्या जवळपास पोहचले आहेत. डिझेलमधील दरवाढ सातत्याने होत असली तरी त्यांना फरसाण, मिठाई यांच्या दरात वाढ करणे शक्य होत नाही. त्यात कोरोनानंतरच्या काळात व्यवसाय अजूनही स्थिरस्थावर झाला नसताना डिझेलची दरवाढ या व्यवसायिकांच्या मुळावर येत आहे.