पुणे : बहुजननामा ऑनलाइन – विचित्र अपघातात एका ट्रक क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मार्केटयार्ड येथे ट्रक व भिंतीच्यामध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक केली आहे. श्यामलाल सुकराम सोळंकी (रा राजस्थान) असे मृत्यु झालेल्या क्लिनरचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक रामदयाल सिताराम सारंग (वय 35, रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली. याबाबत धीरज विकास कसबे (वय 19) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील भुसार बाजारात राजस्थानहुन सामान घेऊन हा ट्रक आला होता. शनिवारी मार्केटयार्ड येथील गोविंददास अँड सन्स गाळा नंबर 462 याठिकाणी हा ट्रक पाठीमागे घेतला जात होता. त्यावेळी क्लिनर शामलाल सोळंकी हा चालकाला माहिती ट्रक मागेपुढे घेण्यास सांगत होता. त्याने ट्रक थांबवण्याचा इशारा केला, पण तो न समजल्याने ट्रक चालक रामदयाल सारंग याने ट्रक पाठिमागे घेतला. यावेळी भिंत व ट्रक यांच्यामध्ये श्यामलाल सोलंकी सापडला आणि चिरडला गेला. गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.