बहुजननामा ऑनलाइन टीम – व्यवसायवाढीसाठी तब्बल 5 कोटीचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी दोघा व्यवसायिकांना बिटकॉईन खरेदी(Bitcoin fraud fund ) करायला भाग पाडले. त्यानंतर ते बिटकॉईन परस्पर विकत दोघांची तब्बल 17 लाख 51 हजार 262 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हितेश बुल्डे (रा. अहमदाबाद) आणि जिग्नेश सोनी असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरज यदूराज सूर्यवंशी (वय 45 रा. जनवाडी) यांनी स्वारगेट पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी यांचा गारमेन्टचा व्यवसाय आहे. तर त्यांचे मित्र नागनाथ परकाळे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोघांना व्यवसाय वाढविण्यासाठी पैशाची गरज होती. त्यांच्या ओळखीच्या जिग्नेश सोनी यांने हितेश बुल्डे यांच्याशी स्वारगेट येथील नटराज हॉटेलमध्ये भेट करुन दिली. तुम्हा दोघांना प्रत्येकी 5 कोटींचे कर्ज हवे असेल तुम्हाला बिटकॉईन खरेदीचे व्यवहार दाखवावे लागतील असे सांगितले. तेंव्हा दोघांनी त्याच्याकडून बिटकॉईन व्यवहारासाठी मोबाईल ॲपलिकेशन डाऊनलोड करुन बिटकॉईनचा व्यवहार सुरु केला.
त्यानंतर एके दिवशी हितेश यांचा सूर्यवंशी यांना फोन आला. तुमचा 1 बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण झाला आहे. मात्र परकाळे यांच्या 1 बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांच्या खात्यात पैसे कमी आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरील काही पैसे परकाळे यांच्या खात्यावर पाठवून त्यांच्या बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण करु असे सांगून त्यांच्याकडील मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेतला. काही वेळातच सूर्यवंशी यांच्या खात्यातील सर्व 10 लाख 16 हजार 911 रुपये परकाळे यांच्या खात्यात जाऊन सूर्यवंशी यांचे खाते रिकामे झाले. त्यावर हितेश यांनी चुकून झाले. परकाळे यांच्या खात्यातून उरलेले पैसे तुमच्या खात्यात परत करतो, असे सांगितले. त्यानंतर परकाळे यांना सांगून तुमच्या खात्यावर आलेले सूर्यवंशी यांचे पैसे परत पाठविण्यासाठी त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेतला. त्यांच्या खात्यावरील त्यांचे 7 लाख 34 हजार 351 रुपये आणि सूर्यवंशी याचे पैसे असे मिळून 17 लाख 51 हजार 262 रुपये तिसऱ्याच खात्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी वारंवार पैसे परत करण्यास सांगितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. स्वारगेट पोलीस तपास करत आहेत.