Pune News | विचार करण्याची शक्ती गमावली तर विनाश अटळ; दीपक घैसास यांचे मत
पुणे : Pune News | “विचार करण्याची शक्ती हेच माणसाचे बलस्थान आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) काळात पुढची पिढी विचार करण्याची शक्तीच ‘आउटसोर्स’ करेल, अशी भीती आहे. विचार करण्याची क्षमता गमावली तर माणसाचे अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे ही शक्ती गमावू नये‘, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने मनोज अंबिके लिखित ‘कर्णपुत्र आणि जन्मरहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन दीपक घैसास यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मन:शक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे, लेखक मनोज अंबिके, लक्ष्मीकांत ढापरे, प्रसाद ढापरे आणि विद्या अंबिके, या वेळी उपस्थित होत्या.
घैसास म्हणाले, ‘कादंबरीच्या माध्यमातून कथा सांगणे हा एक भाग झाला. पण, या लेखनात तत्त्वज्ञान आहे. सूड भावनेने केलेल्या कर्मातून विनाश अटळ आहे. जगावरचे अटळ संकट दूर करण्याचा उद्देश असेल तर केलेले कर्म हे सत्कर्म ठरते, हे तत्त्वज्ञान अंबिके यांनी सांगितले आहे.
बीजात अहंकार असतो त्यावेळी ते द्वैत रूपात असते. पण जेव्हा मातीत मिसळून माती मुल होते तेव्हा ते द्वैताकडून अद्वैताकडे जाते आणि त्याचा वृक्ष होतो. कादंबरीतील नायक सुवेधदेखील द्वैताकडून अद्वैताकडे प्रवास करत आहे.
कादंबरीत प्रत्येक प्रकरणात अगदी चिमटी चिमटीने लेखकाने तत्त्वज्ञान मांडले आहे.
आजच्या राजकारणात इंद्राची झलक पाहायला मिळते कारण त्यांच्यात सतत भीती असते. आपली सत्ता कोणी काबीज करेल हे भय त्यांच्या मनात असते.
धाराशिवमधील मुलांना पाहतो तेव्हा त्यांच्यात शंकराचे प्रतीक मला जाणवते. कारण त्यांच्याकडे काहीही नसते तरी ते शांत आणि आनंदी असतात.
नारायण मात्र त्याच्याकडे सर्वकाही असूनही शांत आणि आनंदी आहे ही त्याची प्रवृत्ती आहे. त्याच नारायणाचं तत्त्वज्ञान लेखकाने मांडलं आहे.
कोहम प्रश्न विचारल्यानंतर सोहम उत्तर मिळते तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. कादंबरीतील सुवेधही सतत कोहम प्रश्न विचारतो त्यामुळेच त्याला आत्मज्ञान होतं.
व्यक्तीच्या मनात कायम द्वंद्व सुरू असते. त्याला सतत खऱ्या खोट्यातून चांगल्या वाईट यातून निवड करावी लागते. क्रोध, मत्सर बाजूला सारून जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा तो योग्यच ठरतो, असेही विचार त्यांनी मांडले.
शिंदे म्हणाले, ‘कादंबरीच्या शेवटामध्ये नव्या पुस्तकाच्या लेखनाचा आरंभ आहे. प्रारब्ध, संघर्ष आणि साहस ही लेखनाची त्रिसूत्री आहे. मानवी स्वरुपातील वैशिष्ट्य प्रत्येक पात्रामध्ये अधोरेखित होत असून, त्यामुळे वाचक रममाण होतात. कर्ण आणि त्याचे पुत्र युद्धात मारले गेले तर हा कर्णपुत्र कोण असा प्रश्न उपस्थित होतो. महाभारतामध्ये उल्लेख नसलेल्या कर्णपुत्राची माहिती या कादंबरीतून मिळते.’
प्रारब्ध काहीही असले तरी आपण आपले कर्म आपल्या हातात आहे. लेखक एक तत्त्वचिंतक आहे. निर्णय घेताना आपला हेतू काय आहे त्यावर त्या निर्णयाचे यश अपयश अवलंबून असते असेही ते म्हणाले.
प्रसाद ढापरे यांनी प्रास्ताविक केले. मनोज अंबिके यांनी मनोगत व्यक्त केले. विद्या अंबिके यांनी आभार मानले. श्रद्धा अंबिके यांनी सूत्रसंचालन केले.


