पुणे : बहुजननामा ऑनलाईन – उसने दिलेले 20 हजार रुपये परत मागितल्यानंतर झालेल्या वादात तीन जणांनी 36 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दिघीत हा प्रकार घडला आहे. मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फईम इक्रमउद्दीन अन्सारी (वय 36) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आसिफ (वय 25) नाझीम (वय 23) व बुऱ्हाण (वय 25) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सलीम इक्रमउद्दीन अन्सारी (वय 37) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फईम इक्रमउद्दीन अन्सारी यांनी आरोपी नाझीम याला 20 हजार रुपये उसने दिले होते. हे वीस हजार रुपये त्याने नाझीम याचा भाऊ आसिफ याच्याकडे परत मागितले होते. याचा राग त्याला आला होता. या रागातून आरोपीनी फईम याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी हा वाद मिटवण्यासाठी फईम याला बोपखेल येथील गणेशनगर मध्ये बोलावून घेत पुन्हा मारहाण केली. यातील आरोपी नाजिम याने फईम त्याच्या नाकावर कसा मारल्यामुळे फईम याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला पोलिसांनी दिघी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता. परंतु सुरुवातीला मारहाणीचा प्रकार विमाननगरमध्ये घडल्याने हा पुन्हा विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.