पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गल्ली बोळातल्या भाईंचा उन्माद कमी होत नसून, स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड करत गाडीच्या टायरला आग लावून एका नागरिकाच्या घरावर टाकत घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आदर्श नरसिंह उदबाळे (वय 23), अनिकेत बाबा खंडाळे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी उमेश राजम (वय 40) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान फिर्यादी यांचे गुलटेकडी डायसप्लॉट येथे दुकान आहे. काल पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास तिघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांच्या दुकानासमोर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच परिसरात दहशत माजवण्यासाठी गोंधळ सुरू केला असता फिर्यादी हे बाहेर आले. यावेळी त्यांनी आरोपींना गाड्या का फोडताय असे विचारले असता त्यांनाच शिवीगाळ करत घर पेटवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर पडलेल्या सायकलचा टायर घेऊन त्याला आग लावली.
तसेच तो टायर फिर्यादी यांच्या गाडीच्या पुढच्या टायारीला आग लावली. पण फिर्यादी यांनी पाणी आणि माती टाकत ती आग विझवली. याचा राग आल्यानंतर या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी पेटता टायर घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण ते पळाले. यावेळी त्यांनी फिर्यादी यांचा पाठलाग केला. फिर्यादी घरात शिरले व त्यांनी दार लावून घेतले. तर आरोपींनी त्यांचे दारावर पेटता टायर टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. फिर्यादी यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांना अटक केली. पण एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आदलिंग हे करत आहेत.