बहुजननामा ऑनलाइन टीम – कोथरुड विधानसभा निवडणूक लढवताना चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil)यांनी सादर केलेले शपथपत्र खोटे असल्याचा आरोप करत पुण्यातील फौजदारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाने क्लिन चिट दिली आहे. अभिषेक हरिदास यांनी चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर न्यायालयात खटला दाखल केला होता.
न्यायालयाने क्लिन चिट दिल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो, भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्या विरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले. अश्या आरोपांची आता सवय झाली असून अश्या खोट्या आरोपांमुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो. मात्र अश्या कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो व समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 (अ) अन्वये चंद्रकांत पाटील यांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आमदार चंद्रकांत पाटील यांचे विरूद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर तक्रार काढून टाकली ( Complaint Dismissed ) व सदर खटला निकाली काढला. ( Case is Disposed off )
भाजपचे मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर या संदर्भात माहिती देताना सांगितले की, तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना चंद्रकांत पाटील यांच्या विरूद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यात प्रामुख्याने…
1. चंद्रकांत पाटील यांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले.
2. तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला.
3. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे ही निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.
4. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध कोल्हापूरच्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.