बहुजननामा ऑनलाइन टीम – लोणी काळभोर येथील बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोयते आणि लाकडी दांडक्याचा धाक(Koyata gang) दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे(Brave robbery ) शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 28 डिसेंबर रोजी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घडली होती. तसेच या टोळीने रांजणगाव येथिल टुरिस्टचा व्यवसाय करणाऱ्या कार चालकाचा दृष्यम स्टाईल खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
किरण भाऊसाहेब थिटे (वय-21 रा. केंदूर ता. शिरूर), गौरव बाळू ढवळे (वय -21 रा. खोप वस्ती, अष्टापुर ता हवेली), संतोष गोरख ब्राम्हणे (वय-20 रा. शनिशिंगणापूर, ता नेवासा जि. अहमदनगर), भाऊसाहेब गौतम कुडुक (वय -22 रा. शेकटा, जिल्हा परिषद शाळे जवळ ता. गेवराई, जि. बीड), दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट (वय -21रा. उंब्रज, दांगट पट, ता जुन्नर, सर्वजण हल्ली रांजणगाव गणपती ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बोरकर मळा येथील पेट्रोल पंपवार दरोडा टाकून 37 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि अडीच हजार रुपयांची रोकड असा एकूण 39 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा माग काढण्यात आला. त्यावेळी आरोपी रांजणगाव गणपती या गावात असल्याची माहिती मिळाली. रांजणगाव येथील राजमुद्रा चौकात पाच संशयित दुचाकीवरुन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याचे कबुल केले.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शनिवारी (दि.2) टुरिस्टचा व्यवसाय करणारा योगेश मछिंद्र गर्जे (वय-25 रा. रांजणगाव) याला वणी गढ येथे फिरायला जायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले. सोनेसांगवी ते मलठण रोडवर गाडी थांबवून गाडी चोरण्याचा प्रयत्न केला असता योगेशने त्यांना विरोध केला. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने आणि दगडाने मारुन त्याचा खून केला. मृतदेहाची ओळख पटूनये यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचला. तसेच मृतदेह मुळामुठा नदीत फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली.
ही कारवाई डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, पोलीस नाईक राजू मोमिन, जनार्दन शेळके, विजय कांचन, मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली.