पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नगरसेवक, आमदार आणि लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळी कामे करून घेतली तर तीन कामे होतील. त्यासाठी एकच काम तिघांकडे घेऊन जाऊ नका. तिघांटडे वेगवेगळी कामे सांगून करून घ्या, समाजाचा विकास हाच आमचा ध्यास आहे. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, तो सार्थ करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. विकासकामासाठी येणे आमचे कर्तव्य आहे. सेल्फीचे प्रेम कायम राहु द्या. सेल्फीचे रूपांतर मतामध्ये करायला पाहिजे. मतदारराजाला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी केले.
कोंढवा खुर्द येथे एन पी 3 लाईन द्वारे व कंपोझिट चेंबर द्वारे ड्रेनेजलाईनचे भूमिपूजन आणि ज्येष्ठ समाजसेवक कै. ताराचंद खंडूजी बाबर चौकाचा नामकरण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. हडपसर विधानसभा अध्यक्ष नारायण लोणकर यांच्या संयोजनातून नगरसेविका नंदा लोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी नगरसेवक प्रशांत जगताप, हाजी गफूर पठाण, हाजी फिरोज शेख, स्वाती पोकळे, माजी नगरसेवक फारुख इनामदार, हसीना इनामदार, रईस सुंडके, संजय लोणकर, प्रसाद बाबर, बापूसाहेब मुलाणी, उदयसिंह मुळीक, मोहसीन शेख,संजय लोणकर, नंदकिशोर रत्नपाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज लोणकर यांनी केले तर आभार संजय लोणकर यांनी मानले.
नगरसेविका नंदा लोणकर म्हणाल्या की, छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत प्रोत्साहन दिले. त्याप्रमाणे खासदार डॉ. अमोल कोल्हे आम्हाला विकासाची कामे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. ओढ्यातील दुर्गंधीमुळे सोसायटी आणि ओढ्याशेजारील नागरिक त्रस्त झाले होते. आता ओढ्यात बंदिस्त लाईन टाकल्यामुळे फक्त पावसाळी पाणी वाहून जाईल. नागरिकांना डास-मच्छरांचा त्रास होणार नाही, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.