MD हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचे 81 ग्रॅम MD जप्त करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
तोफिक मोहम्मद शफी बागवान (वय 26, रा. भवानी पेठ, नेवासकर पेट्रोल पंपाजवळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अवैध धंदे व बेकायदेशीर अमली पदार्थ व अग्नी शस्त्र विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखा कारवाई करत आहे. दरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना साईबाबा नगर येथील सार्वजनिक रस्त्यावर एकजण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ सव्वा तीन लाख रुपयांचे 81 ग्रॅम मेफेड्रॉन आढळले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
—चौकट—
6 महिन्यात 507 ग्रॅम MD पकडले…
गेल्या सहा महिन्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत 507 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहे. याची किंमत 20 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. यात 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 19 आरोपींवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.