बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे महापालिकेच्या मालकिच्या जागांवरील महापालिका सेवकांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी समन्वय अधिकारी( Rajendra Muthe) म्हणून मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेने कर्मचार्यांसाठी वसाहती आणि चाळी उभारल्या आहेत. घोरपडे पेठ, साने गुरूजीनगर, राजेंद्रनगर, गोखलेनगर, कसबा पेठ, शिवाजीनगर, बिबवेवाडी या ठिकाणी प्रामुख्याने या वसाहती व चाळी आहेत. यापैकी बहुतांश वसाहती आणि चाळी या जुन्या आहेत. तर घोरपडे पेठ येथे दोन इमारतींच्या पुनर्निमाणाचे काम बराच काळ रखडले आहे. साने गुरूजीनगर येथील कर्मचारी वसाहतीमधील इमारतीमध्ये दोन वषीं पावसाळ्यात छताचा काही भाग कोसळला. सुदैवाने किरकोळ दुखापतीवर निभावले. परंतू यानिमित्ताने कर्मचारी वसाहतीतील इमारती व चाळींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर निधीची गरज असल्याने पीपीपी तत्वावरही बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतू अर्थकारण तसेच अन्य तांत्रिक अडचणींमुळे पुनर्विकास प्रक्रिया कायमच वादात राहीली आहे. या पार्श्वभूमीवर यातून मार्ग काढण्यासाठी आणि पुनर्विकासाला गती देण्यासाठी उपायुक्त राजेंद्र मुठे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज तसे आदेश दिले असून बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता, भवन रचना विभागाचे अधीक्षक अभियंता व झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग – चाळ विभागाचे उपायुक्त यांच्यासोबत समन्वय साधून राजेंद्र मुठे यांना वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.