पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई, पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र पिंपरी येथील सेंटरमधील भोंगळ कारभार पहिल्याच दिवशी समोर आला. कोविड सेंटरमधील एसी बंद पडल्याने उपचार घेणा-या 100 रुग्णांसह डॉक्टरांचे प्रचंड हाल झाले. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसला आहे. मात्र यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटरमधील एसी सुरू होण्यास किती वेळ लागेल याची माहिती दिली जात नाही.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 1 एप्रिलपासून शहरातील जम्बो कोविड सेंटर केले जातील, असे सांगितले होते. त्यानुसार आजपासून कोविड सेंटर सुरु करून 100 रुग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार सुरु केेले आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी रुग्णांचे कोविड सेंटरमध्ये हाल झाले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूसह सज्ज अससेल्या या जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 200 बेडची व्यवस्था केली आहे. 1 सप्टेंबर 2020 रोजी हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु केले होते. मध्यंतरी करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारीपासून जम्बो सेंटर बंद केले होते. मात्र ते पुन्हा सुरु करण्यात आले आहे.