पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पान स्टॉलवर येऊन दम भरणाऱ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण करून त्याला दारू पाजत दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी वानवडीत या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता.
अझान झहीर अन्सारी (वय 12, रा. कोंढवा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित गौतम बनसोडे (वय 27, रा. उंद्री), अजय विजय गायकवाड (वय 22, रा. महमंदवाडी), श्रीकांत भीमराव साठे (वय 20, रा. कृष्णानगर) व अक्षय अनिल जाधव (वय 20, रा. वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा तर कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. रोहन अजित सिंग व सतीश गायकवाड यांचा शोध घेतला जात आहे.
अझान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर घरफोडीसह वेगवेगळे गुन्हे दाखल होते. दरम्यान यातील सतीश गायकवाड याची पान स्टॉल होते. त्याठिकाणी अंझार हा येत आणि त्याला दमदाटी करत. त्यामुळे तो अंझार याच्या त्रासाला कंटाळला होता. या रागातूनच त्याने त्याला मारण्याचा कट रचला. रोहन सिंग व रोहित गायकवाड या दोघांनी त्याला सतीश याने बोलावले असल्याचे सांगितले आणि बाहेर बोलावले. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसर हेवन पार्क सोसायटी परिसरात नेले. तेथे त्याला दारू पाजून त्यानंतर या चौघांनी त्याचा दगडाने ठेचून खून केला. ओळख पटू नये म्हणून चेहरा ठेचून विद्रुप केला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले होते. त्यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी पोलिसांना तो कोंढवा परिसरातील बाल गुन्हेगार अझान असल्याचे समोर आले. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी देखील या गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांना ज्या दुचाकीवरुन अझान याला नेण्यात आले होते. त्या दुचाकीची माहिती मिळाली व ती दुचाकी येथील महमंदवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार या चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार व पथकातील सहायक निरीक्षक चेतन मोरे, कर्मचारी ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, सुनील धिवार, अमित साळुंखे यांच्यासह पथकाने केली.