पुणे : बहुजननामा ऑनलाईन – काळेपडळ येथील रोहन काळे आरोग्य केंद्र अचानक बंद केले. तेथील कर्मचारी मनपा शाळा क्र.३२ मध्ये आले होते. मात्र, येथे आज नेमके कोणी काम करायचे यावरून वादविवाद सुरू होते. प्रशासनाचा विचित्र कारभार पाहून लसीकरणासाठी आलेले नागरिक चक्रावून गेले. संगणक, नेट आणि तात्काळ नोंदणी करण्याची यंत्रणा नव्हती. त्यामुळे नागरिक रांगेत थांबले होते, तरीसुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंत एकाही नागरिकांना लस दिली गेली नाही, असे ससाणेनगर नागरी कृती समितीचे मुकेश वाडकर यांनी सांगितले.
वाडकर म्हणाले की, हडपसरमधील महापालिका शाळा क्र.३२ मधील लसीकरण केंद्रावर वृद्ध आणि अपंग व्यक्तींना तीन तास रांगेत थांबूनही लस मिळाली नाही. मात्र, कोरोना महामारीच्या वाढत्या भीतीबरोबर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उलट मनस्ताप सहन करावा लागला. अनेक अशिक्षित ज्येष्ठ नागरिकांकडे मोबाईल नाही, त्यामुळे त्यांना नोंदणी करण्यापासूनच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने त्यांना मदत करण्याऐवजी मनस्ताप दिल्याचा प्रकार मनपा शाळा क्र.३२ मध्ये उघडकीस आल्याचे ससाणेनगर नागरी कृती समितीचे मुकेश वाडकर यांनी सांगितले
वाडकर म्हणाले, भल्या पहाटेपासून कोविड लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह अपंगांचाही समावेश होता. प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केंद्रावर तात्काळ नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अज्ञानी ज्येष्ठ नागरिकांसह अपंगांना लस न घेताच मनस्ताप सहन करावा लागला, असे त्यांनी सांगितले.
काळेपडळ येथील गोरख अकाळे (अपंग) म्हणाले की, मनपाच्या शाळा क्र.३२ मध्ये लसीकरण सुरू झाल्याचे समजले, त्यामुळे मी सकाळी ९ वाजता येथे येऊन थांबलो, त्यानंतर पालिकेचे ९.३० अधिकारी-कर्मचारी आले. त्यानंतर त्यांनी सेटअप लावून कामकाज सुरू केले. मात्र, संगणक, इंटरनेट आदी सुविधा नसल्यामुळे नोंदणी केल्याची काही माहिती नव्हती, त्यामुळे मोबाईलवरून नोंदणी पाहून लस दिल्याची वहीमध्ये नोंद करत होते. माझ्याकडे आधार कार्ड होते, मोबाईल नव्हता, त्यामुळे मला लस मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.
काळेपडळ येथील शशिकला बाळासाहेब झुरुंगे (वय ७०) यांनी पहिला डोस घेतला होता, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता, मात्र आधार कार्ड होते, तरीसुद्धा त्यांना दुसरा डोस दिला गेला नाही. तर विमल लक्ष्मण ससाणे (वय ७१) यांच्याकडे आधारकार्ड नव्हते, मात्र निवडणूक कार्ड होते, त्यांना आधारकार्ड नसल्याचे कारण देत त्यांना लस न देता पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रातून बाहेर काढल्याचा प्रकार घडला, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
दरम्यान, फ्रंट लाइन वर्करला ओळखपत्र असणाऱ्यांसाठी ३० टक्के लस देण्याचा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे अॅनेक्स-ए लेटर नसल्याचे सांगून त्यांना लस दिली नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी दोन तास रांगेत थांबून लस मिळाली नाही, उलट प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचे मेडिकल रीप्रीझेंटेटिव्ह संदेश रासकर यांनी सांगितले.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आजच पदभार घेतला आहे. तरीसुद्धा नवीन लसीकरण केंद्रावर डॉक्टर, कर्मचारी, संगणक, नेट, टेबल खुर्च्या, मंडप, रांग लावण्यासाठीची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून दिली जाईल. तसेच नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा पालिका प्रशासनातर्फे प्रयत्न असणार आहे. नागरिक हाच केंद्रबिंदू मानून सुरू अधिकारी-कर्मचारी काम करण्यास प्राधान्य देतील, असे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले.