मावळ/पुणे : – Pune Mumbai Highway Accident | जुना मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव चौकात (Vadgaon Chowk) मालवाहू कंटेनरचा विचित्र अपघात झाला आहे. स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात बुधवारी (दि.19) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव चौकातील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचवण्याचा प्रयत्नात पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सर्व्हिस रस्त्यावर आला. यावेळी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिला कंटेनरने चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले असून यामध्ये तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लता रणजीत जाधव (वय-40 रा. कुडे वाडा, वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर संदीप झालटे (वय-40 रा. वडगाव मावळ), सृष्टी भाटेकर (वय-15), मैत्रेय भवार (वय-11), मृणाल भवार (वय-14 सर्व रा. वडगाव मावळ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी वेगवगेळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास काही प्रवासी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी बस स्टॉप समोर एक स्कूल बस थांबली होती. यावेळी मुंबई वरुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा कंटेनर हा पुढे उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रस्त्याकडे घुसला. एक कार व दोन दुचाकींना धडक देऊन टपरीत घुसला. यामध्ये बसची वाट पाहणारी महिला कंटेनरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर शाळकरी मुले जखमी झाले.
पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करुन महिलेचा मृतदेह बहेर काढला. या अपघातामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.