पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक विवादास्पद अभियान सुरु केले आहे. मनसेचे कार्यकर्ते शहरातील अशा भागात जात आहेत जिथे बांगलादेशी नागरिक राहत आहेत. मनसेचे कार्यकर्ते तिथे जात आहेत आणि त्यांच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागत असल्याचे वृत्त एका राष्ट्रीय हिंदी चॅनेलने दिले आहे.
भाड्याने राहणाऱ्या लोकांकडून मागितला जात आहे पुराव्याचा कागद
मिळलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील धनकवडी भागात मोठ्या संख्येने लोक भाड्याने राहत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी या नागरिकांकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितले आहेत. इथले लोक मनसे कार्यकर्त्यांना कागदपत्रे दाखवत आहेत. एवढेच नाही तर सत्यता पडताळण्यासाठी पोलीस आधिकारी देखील त्यांच्यासोबत असल्याचे कळते आहे. पोलीस या कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार मागील आठवड्यापासून शहरातील ज्या भागात बांगलादेशी घुसखोर राहत आहेत, मनसे कार्यकर्ते अशा भागात नजर ठेऊन आहेत.
धनकवडी परिसरात पोलिसांसह पोहोचले कार्यकर्ते
शनिवारी सकाळी पुण्यातील धनकवडी भागात मनसेचे कार्यकर्ते पोलिसांसोबत पोहोचले आणि त्यांनी काही लोकांची चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान एका युवकाकडे दोन ओळखपत्रे मिळाली आहेत. त्या युवकाला पोलीस ठाण्यात नेले आहे.
घुसखोरांना बाहेर हाकलण्याची मागणी
9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने CAA-NRC च्या समर्थनार्थ एक विशाल रॅली काढली होती. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवैध बांगलादेशींना शहराबाहेर हाकलण्याची मागणी केली. घुसखोरांना देशाबाहेर काढून देश स्वच्छ ठेवायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले होते. काही लोक फक्त शक्ती दाखवण्यासाठी सीएए-एनआरसीविरोधात आंदोलन करत असतील तर त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.