पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लसीकरण केंद्रांवरील गोंधळ दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कडक पावले उचलली आहेत, याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले आहे. सर्व लसीकरण केंद्रांवरील महापालिकेव्यतिरिक्त सर्व बोर्ड, बॅनर येत्या दोन दिवसांत प्रशासनाने काढावेत अथवा मनसेचे कार्यकर्ते ते काढतील, असे मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
वागसकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनामध्ये लसीकरण केंद्रावरील गोंधळ कमी करण्यासाठी तसेच लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मनसेचे शहरअध्यक्ष वसंत मोरे, महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर, मनसेच्या महिला अध्यक्षा अॅड. रुपाली पाटील व पदाधिकार्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. मनसेच्या मागणीची तातडीने दखल घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लसीकरण केंद्रावरील गोंधळ कमी करून लसीकरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी निर्णय घेत अंमलबजावणीही सुरु केली. नागरिकांच्या हिताच्या निर्णयामध्ये मनसे कायम प्रशासनाच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही वागसकर यांनी दिली आहे. त्याचवेळी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सर्व लसीकरण केंद्रावर महापालिके व्यतिरिक्त लावण्यात आलेले बोर्ड, बॅनर, झेंडे दोन दिवसांत काढून टाकावेत अथवा मनसेच्या कार्यकर्ते सदरील बोर्ड व बॅनर काढतील, असेही वागसकर यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे.