Pune Metro | पुणे मेट्रो रेल्वे प्रशासनास मराठीचे वावडे, मराठी तिकिटे छापण्यास नकार

Pune Metro

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Metro | पुणेकर नागरीकांच्या सुविधेसाठी नागरिकांच्या कररूपी पैशातून कोट्यावधी रूपये खर्च करून सुरू करण्यात आलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पात या अगोदर मराठी उमेदवारांना नोकरभरतीत स्थान दिले जात नसल्याची गंभीर बाब ताजी असतानाच मराठी एकीकरण समितीकडे नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार पुणे मेट्रो प्रशासनाकडून वितरीत केली जाणारी तिकिटे स्थानिक मराठी भाषेत छापली जात नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानुसार समितीने मेट्रो प्रशासनाकडे मराठी भाषेत तिकिटे छापावीत यासाठी पाठपुरावा केला परंतू मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी श्री. सोनवणे यांनी मराठीत तिकिटे छापणे शक्य नसल्याचे सांगून पुणे शहराचे वैभव म्हणून मिरवणा-या मेट्रो प्रशासनाला मराठीचे वावडे असल्याचे दाखवून दिलेले आहे.

पुणे मेट्रोकडून वितरीत केली जाणारी तिकीटे मराठी भाषेत उपलब्ध नसल्याबाबतची तक्रार मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोर्वधन देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पुणे शहरातील समितीचे सदस्य अविराज मराठे व तुषार गोडसे यांनी याबाबत पुणे मेट्रो प्रशासनाकडे डिंसेबर महिन्यात तक्रार नोंदवली. पुणे मेट्रो प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी यांनी गेले दोन महिने आम्ही यावर काम करीत असून लवकरच मराठी तिकिटे उपलब्ध होतील अशी खोटी माहिती तक्रारदारास पुरविली. परंतू या आठवड्यात पुन्हा पाठपुरावा केल्यावर मराठी तिकिटे छापणे शक्य नसल्याचे त्यांनी कळवले.

तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवर लेखी उत्तर मागीतले असता असे लेखी उत्तर देणे शक्य नसल्याचे श्री. सोनवणे यांनी कळवून एकप्रकारे पुणे मेट्रो स्थानिक मराठी भाषेविषयी किती जागरूक हेच दाखविलेले आहे. पुण्यासारख्या मराठी भाषेचे सांस्कृतिक केंद्र असणा-या महानगरातील मेट्रो प्रशासनास राजभाषा मराठीचे वावडे असणे हे एक प्रकारे तमाम मराठी जनतेचा अपमानचं आहे. दिल्ली मेट्रोची तिकिटे हिंदीत वितरीत होतात, पश्चिम बंगालमधील तिकिटे बंगालीत वितरीत होतात मग पुणे शहरातील तिकिटे मराठीत का वितरीत होऊ शकत नाहीत असा प्रश्न मराठी एकीकरण समिती पुणे मेट्रो रेल्वे प्रशासनास विचारू इच्छिते.

याबाबत लवकरच पुणे शहरातील नागरीकांना एकत्रित करून पुणे मेट्रो प्रशासनाविरूद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितिचे पुणे शहरातील पदाधिकारी प्रमोद पाटील, रविंद्र कळमकर, राज जाधव, प्रतिक जडे व इतर सहका-यांनी निश्चित केलेले आहे.