Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील, वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न
पुणे: Pune Metro News | स्वारगेट मेट्राे स्टेशन येथून कात्रज (Swargate To Katraj Metro) पर्यंतच्या साडेपाच किलाेमीटर अंतरावरील मार्केटयार्ड, पदमावती व कात्रज या तीन मेट्राे स्टेशनचा प्रस्तावित भूमिगत मेट्राे मार्गास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या मार्गावरील निविदा प्रक्रिया सुरु हाेऊन त्यानंतर वर्क ऑर्डर काढण्यात येणार आहे. त्याबरोबर या मार्गावर तीन मेट्राे स्थानकाऐवजी प्रवासी मागणीनुसार पाच मेट्राे स्टेशन करण्यात यावीत. यामध्ये बालाजीनगर व सहकार नगर-बिबवेवाडी मेट्राे स्टेशनचा समावेश करण्याबाबत व्यवहार्यता तपासावी, अशा सुचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला केल्या आहेत.
पुणे मेट्राे कार्यालयात मेट्राे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुण्यातील सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्यास राज्य सरकारचे प्राधान्य आहे. पुणे मेट्राे एक महत्वपूर्ण प्रकल्प असून त्याची कामे वेगाने पूर्ण हाेऊन वाहतूक काेंडी दूर व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून शहरातील वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी ‘ट्रान्सपाेर्ट मॅपिंग’ चा विषय हाती घेतला आहे. नेमकी मेट्राे, बस, रेल्वे, रिक्षा काेठे आहे याची एकत्रित माहिती प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत एकत्रित नकाशा आम्ही विविध यंत्रणांशी समन्वय साधून तयार करत आहोत.
पुण्यातील वनाज ते चांदणी चाैक आणि रामवाडी ते वाघाेली या दाेन मेट्राे मार्गिकांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असून कॅबिनेट बैठकीत लवकरच त्यास अंतिम मान्यता मिळेल. याशिवाय खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग- वारजे- एसएनडीटी असे दाेन मेट्रो मार्गाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले असून ते तज्ज्ञ कमिटीसमोर जाऊन त्याबाबत पुढील निर्णय हाेईल”, असे माधुरी मिसाळ यांनी म्हंटले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ” स्वारगेट मेट्राे स्टेशन येथे मल्टीमाॅडेल ट्रान्सपाेर्ट हब तयार करण्यात येत असून ते स्वारगेट एसटी स्थानकास देखील जाेडण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव पुणे मेट्राेने एमएसआरटीसी यांना द्यावा. त्यानुसार सदर मेट्राे स्टेशन व एसटी स्टेशन एकमेकांना जाेडल्यास प्रवाशांना त्याचा फायदा हाेईल. एमएसआरटीसी व पुणे मेट्राे याबाबत नवीन करार करतील त्यानुसार आगामी काळात काम सुरु हाेईल. पुढील आठवडयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक होणार आहे. त्यात विविध गाेष्टींवर निर्णय घेतला जाईल”, असेही मंत्री मिसाळ यांनी म्हंटले आहे.



Comments are closed.