बहुजननामा ऑनलाइन टीम – माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डेअरची फ्रॅन्चायजी घेण्यासाठी सासरचे माहेरहून पैसे आणण्यास सांगत होते.
आशा करण सहानी (वय 22) असे आत्महत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती करण गुलाब सहानी आणि सासू कलिलावती गुलाब सहानी (रा. वारजे माळवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माऊल धनराज सहानी (50, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती करण व सासू कलिलावती हे आशा यांना वारंवार घरगुती कारणावरून तसेच एका दूध डेअरीची फ्रेंचायजी घ्यायची आहे म्हणून माहेरहून पैसे आण म्हणून तगादा लावत होते. याच त्रासाला कंंटाळून 31 ऑक्टोबर रोजी आशा यांनी आत्महत्या केली. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक कथले करत आहेत.