पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या लाचखोर मुकादमाच्या घरी तब्बल ३६ लाख रुपयांचं घबाड सापडलं आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने केली . पथकाने त्याच्या घरी शनीवारी छापा टाकला. येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडून ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या या मुकादमाच्या घरी टाकलेल्या छाप्यात ३६ लाखांची रोकड मोजताना एसीबीचे अधिकारीही थक्क झाले. शनिवारी रात्रभर ही कारवाई चालू होती. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम सुनील शर्मा आणि मदतनीस गोपी उबाळे या दोघांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सापडलं पैशानी भरलेलं पोतं
याबाबत माळलेली अधिक माहिती अशी की, सुनील शर्मा हा पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम पदावर कार्यरत आहे. तर उबाळे हा त्याची बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी मुकादमाने पाचशे रुपयांची लाच घेतली होती. एसीबीने या प्रकरणी दखल घेऊन शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने आढळून आले. पाचशे रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुकादमाकडे मोठी रोकड मिळेल, असा अंदाज एसीबीच्या तपासपथकालाही नव्हता. त्यामुळे या पथकाला रात्र जागून काढावी लागली. याठिकाणी 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने मिळाले. दागिने आणि रोकड जप्त करून ते येरवडा पोलिस ठाण्यात पहाटे जमा करण्यात आले आहेत. एका मुकादमाच्या घरी इतकी रोकड सापडल्याने पोलिसही आवक झाले आहेत. शर्मा याची दोन लग्नं झाली असून एक पत्नी 10 बाय 10 च्या खोलीत राहते तर दुसरी लाडकी पत्नी बंगल्यात राहते. याच बंगल्यात पोलिसांना ही रक्कम पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली.
या कारवाईत एसीबीच्या तपास पथकाला तब्बल 36 लाख रूपयांची रोकड आणि आठ तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत. मुकादमाच्या घरी एवढी मोठी रक्कम पाहून एसीबीचे अधिकारीही थक्क झाले. शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. पथकातील अधिकारी नोटा मोजत बसले होते.