खेड/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – विक्री केलेली जमीन बाजारभावापेक्षा कमी दराने जमीन विकाण्यासाठी दबाव आणून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याच्या निमित्ताने खेड पोलीस ठाण्यात बोलावून धमकी देत तिघांना 25 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत खेड पोलीस ठाणे येथे घडला.
सुदाम मटलामल नारंग (वय-58 रा. सोपानबाग, पुणे), संदीप भोगीलाल शहा, नरेंद्र रीखबदास संचेती अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुदाम नारंग यांनी 29 मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नारंग यांच्या तक्रारीनुसार संतोष घनश्याम डोळस (रा. चांडोली, ता. खेड), त्याची पत्नी, बहिण आणि इतर 20 ते 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदाम नारंग यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी संदीप शहा व अपूर्व शहा यांच्या सोबत मिळून खेड तालुक्यातील चांडोली गावात जमीन खेरेदी केली होती. जमिनीत जाण्या-येण्यासाठी त्यांनी आरोपी संतोष डोळस याच्या कुटुंबीयांकडून 7 लाख 50 हजार रुपये देऊन रस्त्याचे हक्क खरेदी केले होते. त्यानंतर संतोष डोळस याने त्यांच्या जमिनी परत मागितल्या. परंतु डोळस हा बाजारभावापेक्षा कमी मोबदला देत असल्याने फिर्यादी यांनी जमीन विकण्यास नकार दिला.
दरम्यान, दोन जमिनीपैकी एका जमिनीचे प्लॉटींग करुन नारंग यांनी अमोल मानमोडे याच्या मध्यस्थीने प्लॉटची विक्री केली. डोळस याला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जमिनींचे व्यवहार रद्द करण्यास सांगून त्या ती मी सांगेल त्या भावाला मलाच विक्री करायची अशी दमदाटी केली. तसेच जमीन दिली नाही तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने राजगुरुनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला.
काही दिवसांनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यांना जबाब देण्यास येण्यास सांगितले. जबाब देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस अधिकारी निलेश बडाख यांनी फिर्यादी आणि आरोपी यांना एका केबीनमध्ये बसवले. त्यानंतर अचानक पोलीस अधिकारी निलेश बडाख हे केबीन बाहेर निघून गेले. त्यानंतर डोळस यांनी फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच उरलेली सर्व जमीन नावावर करुन द्या नाहीतर जिवंत कसे जाता हेच बघतो अशी धमकी दिली. पोलीस अधिकारी तेथून गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी, संदीप शहा, व नरेंद्र संचेती यांना चप्पल, बुटांनी तोंडावर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी तिघेजण घाबरून जमीन डोळस याच्या नावावर करुन देण्यात तयार झाले.
डिसेंबर 2020 मध्ये डोळस, एक महिला आणि एक पोलीस संदीप शहा यांच्या सदाशिव पेठेतील कार्यालयात आले. त्यांनी येतानाच सोबत जमीनीचे खरेदीखत तयार करुन आणले होते. त्यावर संदीप शहा आणि फिर्यादी यांच्या सह्या घेतल्या. तेथून जाताना डोळस याने धमकी दिली, मी ज्यावेळी बोलवेल त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात यायचं आणि खरेदीखतावर सह्या करायच्या. अन्यथा तुम्ही पुढील वर्ष बघू शकणार नाही, अशी धमकी दिली. तसेच मी दिलेले चेक्स फक्त खरेदीखतामध्ये लिहिलेले आहेत. ते वटवायचे नाहीत आणि खरेदीखत झाल्यानंतर ते चेक्स माझ्या समोर फाडायचे.
दरम्यानच्या काळात डोळस याने फिर्यादी यांनी विक्री केलेल्या प्लॉट खरेदी केलेल्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. डोळस याने प्लॉट खरेदी केलेल्या लोकांचा सामायिक रस्ता बंद केला. प्लॉट खरेदी करणाऱ्यांना त्रास होत असल्यामुळे प्लॉट खरेदी केलेल्यांनी सुदाम नारंग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा खेड पोलीस ठाण्यात दाखल केला. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.