Pune Kalyaninagar Porsche Accident | पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाबरोबर त्याच्या दोन मित्रांचेही ब्लड रिपोर्ट बदलले
पुणे: Pune Kalyaninagar Porsche Accident | कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात आणखी एक अपडेट समोर आली आहे. पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते (Blood Sample Tampering Case) . मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली आहे.
एवढेच नव्हे तर त्यासाठी अल्कोहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट मुख्य वैद्यकीय अधिकार्याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत. दोषारोप पत्रात हे नमूद करण्यात आले आहे. नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत ९०० पानांचे दोषारोपपत्र हे सत्र न्यायालयात दाखल केले आहे.
कल्याणीनगर येथे मध्यरात्री अपघात घडल्यानंतर १९ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता येरवडा पोलिसांनी कारचालक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या सोबत अपघात ग्रस्त कारमध्ये असलेले दोन मित्र अशा तिघांना घेऊन त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे का? हे पाहण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते.
त्यावेळी प्रथमोपचार विभागाचा प्रमुख डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) हा उपस्थित होता. त्याच्यासमोरच या तीन मुलांना हजर करण्यात आले होते. हळनोर याने तीन मुलांना काय त्रास होतोय का, असे विचारून वैद्यकीय केस पेपर तयार केले.
दरम्यान, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख असेला डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) याने अगोदरच डॉ. हळनोर याला सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार हळनोर याने सीएमओ रुमच्या बाजूला डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्ट रुममध्ये कार चालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने घेतले. यानंतर आणखी तीन व्यक्तींच्या रक्ताचे नमुने त्याच खोलीत घेण्यात आले.
त्यामध्ये अल्पवयीन कार चालक मुलासाठी एका महिलेचे, तर त्याच्या दोन मित्रांसाठी इतर दोन व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर मुलाचे आणि त्याच्या मित्रांचे रक्तांचे नमुने डॉ. हळनोर याने कचर्याच्या पेटीत टाकून दिले. त्याऐवजी महिला आणि इतर दोन व्यक्तीचे रक्त नमूने तपासणी करण्यासाठी पाठवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.