पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरातील कोरोना रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना ऑक्सीजनवरील रुग्णांचेही प्रमाण कमी होत आहे. ससून, सीओईपी जंबो कोविड रुग्णालय व महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये ५०० ऑक्सीजन बेडस् रिक्त आहेत, तर महापालिकेने करार केलेल्या प्रमुख १० रुग्णालयांमध्ये महापालिकेने दाखल केलेले ७७९ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. तूर्तास तरी शासकिय आणि महापालिकेच्या रुग्णालयातच रुग्ण दाखल करण्यास प्राधान्य दिल्यास महापालिकेच्या कोरोनावरील खर्चात बचत होणार असून सात महिन्यांपासून कोरोना ड्युटीत अडकलेल्या मनुष्यबळाचेही योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.
शहरात मध्यंतरीच्या काळामध्ये १८ हजारांवर पोहोचलेली ऍक्टीव्ह कोरोना रुग्णसंख्या १३ हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे मागील महिन्यांत ऑक्सीजन बेडसाठी धावाधाव करणारे रुग्ण व नातेवाईक हे चित्र आता जवळपास कमी झाले आहे. जवळपास शहरातील सर्वच प्रतिथयश खाजगी रुग्णालये, महापालिकेने करार केलेली खाजगी रुग्णालये, शासकिय ससून रुग्णालय, ऑक्सीजनची सुविधा असलेली महापालिकेची पाच रुग्णालये आणि सीओईपी येथील जंबो कोव्हिड हॉस्पीटलमध्येही किमान आठवड्यापासून ऑक्सीजन बेडस् रिक्त असून सहजासहजी उपलब्ध होत आहेत.
महाापलिकेने स्वत:च्या रुग्णालयातील ऑक्सीजन बेडस्ची सज्जता वाढवतानाच करार केलेल्या खाजगी हॉस्पीटलमधील तसेच राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांतील ८० टक्के बेडस्ही ताब्यात घेतले आहेत. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडूनच कोरोना बाधितांचे रुग्णालयांमध्ये ऍडमिशन होत आहे. महापालिने ज्या खाजगी रुग्णालयांसोबत करार केला आहे, त्या रुग्णालयांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेनुसार तसेच राज्य शासनाने निश्चित केलेले दर आणि नियमानुसार प्रत्येक रुग्णाचे बिल देण्यात येत आहे. तर राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेतूनही काही रुग्णांचे बिल अदा करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या कमी झाली असताना त्यातही ऑक्सीजन बेडस्ची आवश्यक्ता असलेेले रुग्ण घटले असताना ससून, जंबो हॉस्पीटल तसेच महापालिकेच्या रुग्णालयातील सुमारे ५०८ ऑक्सीजन बेडस् रिक्त आहेत. त्याचवेळी करार केलेल्या १० खाजगी रुग्णालयातील फक्त २१९ ऑक्सीजन बेडस् रिक्त आहेत, तर या हॉस्पीटलमध्ये ७७९ ऑक्सीजन बेडस्वर महापालिकेने पाठविलेले रुग्ण आहेत. शासकिय व महापालिकेच्या रुग्णालयात एका ऑक्सीजन बेडसाठी दररोज ३ हजार ५०० रुपये खर्च येतो, तर खाजगी रुग्णालयात महापालिका व शासन सुमारे ४ हजार रुपये देते. कोरोनाचे रुग्ण किमान ५ ते १० दिवस रुग्णालयामध्ये असतात.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने किमान प्राथमिकता आणि रुग्णाची प्रकृती लक्षात घेउन शासकिय व महापालिकेच्या रुग्णालयामधील ऑक्सीजन बेडस्वर रुग्ण दाखल केल्यास काही अंशी खर्चात बचत होणार आहे तसेच कोरोना ड्युटीसाठी तैनात असलेल्या आरोग्य विभागा व्यतिरिक्त अन्य विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना काहीसा रिलिफ मिळणार आहे. यासोबतच शहरातील थांबलेले विकास चक्र सुरू होण्यासही मदत होणार आहे.
महापालिकेच्यावतीने रुग्णसंख्या व बेडस्चा आढावा सातत्याने घेण्यात येत आहे. महापालिकेची रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालयांनी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना चांगले काम केले आहे. परंतू प्रत्येक टप्प्यावर रुग्णसंख्या व गरज लक्षात घेउन शासन आणि महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. कोरोना रुग्णाच्या प्रकृतिचा अंदाज घेउन यापुढील काळात महापालिकेच्यावतीने उपचारासाठी दाखल करण्यात येणार्या रुग्णांना महापालिकेच्या व ससून रुग्णालयात दाखल करण्यास प्राधान्य देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. संजय वावरे (सह आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका)