पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दौंड तालुक्यातील शिरापूर हिंगणी येथे भीमा नदीच्या अवैधरित्या सुरू असणार्या वाळू उपशावर बारामती गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल अडीच कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वाळू उपशाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते. यामुळे पुर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी 17 जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूक करण्यात आले आहे.
राज्यभरात नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. त्यावर तहसील कार्यालय तसेच महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. परंतु, महसूल विभागातील कर्मचार्यांना जीवे ठार मारण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सहसा कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाहीत. तर, अनेकठिकाणी मिलीभगत करून वाळू उपसा केला जातो.
पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, महसूल विभागाकडून त्यावर कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान, शिरापूर हिंगणी येथे भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असलेबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांचे पथकाने छापा टाकला. त्यावेळी नदी पात्रात वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही लिलाव करण्यात आला नसताना बेकायदेशीर पणे यांत्रिक बोटीने वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी 1 कोटी 14 लाख रुपयांच्या 19 फायबर लोखंडी बोटी तसेच, 62 ब्रास वाळू आणि इतर साहित्य असा एकूण 2 कोटी 43 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कारवाईनंतर दौंड पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.