पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झालेला नसतानाही गुपचूप दुसरे लग्न करणार्या पतीला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पद्माकर जोंधळे यांनी हा निकाल दिला. पहिल्या पत्नीबरोबर विभक्त होण्यासाठी दोघांनी संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शैलेश आणि रेखा यांचे दोन नोव्हेबर २००१ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी शैलेश याने रेखा यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सूरूवात केली. वाद वाढतच गेल्याने दोघांनी २५ एप्रिल २००५ रोजी येथील न्यायालयात संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. मात्र त्यावर निकाल होण्यापूर्वीच शैलेश यांनी १३ जुलै २००५ रोजी नेहाशी (सर्व नावे बदललेली) लग्न केले. त्यामुळे पत्नी जिवंत असतानाही दुसरे लग्न केले म्हणून रेखा यांनी शैलेश आणि नेहा विरोधात ॲड. मानसी जोशी यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला.
रेखा यांना दरमहा पोटगी देण्याचे आदेश :
दोन्ही दाव्यांची सुनावणी सुरू असताना रेखा यांनी पतीकडून पोटगी मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यात रेखा या शैलेश यांच्या कायदेशीर पत्नी आहेत, असे नमूद करीत रेखा यांना दरमहा तीन हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशाविरुद्ध शैलेशने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.
रेखा यांच्या आधीच नेहाशी लग्न झाल्याचा केला बनाव :
शैलेश याने १९९९ सालीच नेहाशी लग्न झाले आहे. तर रेखा यांच्याशी लग्नच केले नसल्याचा बनाव केला. मात्र जर लग्न १९९९ मध्येच झाले तर त्याची नोंदणी २००५ मध्ये का करण्यात आली? याबद्दल कोणताही योग्य व कायदेशीर पुरावा आरोपींनी सादर केला नाही. त्यामुळे शैलेश आणि नेहा यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली तारीख ही लग्नाच्या तारखेबाबतचा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. न्यायालयात सादर पुराव्यांवरून आरोपींचा विवाह १९९९ नाही तर २००५ साली झाल्याचे सिद्ध झाले.