पुणे बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय वैद्यकिय आयोग ( एनएमसी) विधेयकाविरोधात आणि डॉक्टरांच्या अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएशनने देशभरात संपाची हाक दिली आहे. मात्र पुण्यातील आयएमएशी संलग्न असलेल्या डॉक्टरांनी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. संपाला आमचा पाठींबा आहे. परंतु राज्यातील बहुतांश भागात पूरस्थिती असल्याने संपात सहभागी होणार नाही अशी भुमीका त्यांनी घेतली आहे.
काय म्हणाले पुण्यातील डॉक्टर ?
संपाला आमचा पाठींबा आहे. परंतु राज्यात पूरस्थिती आहे. विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पाहता संपात सहभागी होऊ नये असा निर्णय आम्ही घेत आहोत. डॉक्टरांच्या १० ते १२ टीम रुग्णांच्या सेवेसाठी स्थापन केल्या आहेत. त्या टीम विविध ठिकाणी जाऊन रुग्णांवर उपचार करणार आहेत. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही संपात सहभागी होणार नाही. असं आएमएच्या शाखेचे डॉ. संजय पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय वैद्यकिय आयोग या विधेयकाविरोधात आएमएने ८ ऑगस्ट रोजी देशभरात २४ तासांच्या संपाची हाक दिली आहे. या संपादरम्यान खासगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा, रक्त, लघवी, तपासणी, तसेच एमआरआय व सिटी स्कॅन या सेवाही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. परंतु पुण्यातील डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखवत राज्यातील नैसर्गिक आपत्ती पाहता संपात सहभागी न होण्याचा निर्णय़ घेतला आहे.