बहुजननामा ऑनलाइन टीम – ई-कॉमर्स (online shopping)कंपनीतून बोलत असल्याचे सांगून गिफ्ट देण्याच्या अमिषाने एका डॉक्टरची (doctor) सुमारे 1 लाख 7 हजार (1-7-lakh) रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. रॉबीन प्रमोद चौधरी (वय ३३, रा.वानवडी, मूळ बिहार) यांनी वानवडी पोलीसात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी हे कमांड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १४ ऑक्टोबरला अॅमेझॉन’वरून खरेदी केली. त्यानंतर ऑनलाइन खरेदी करताना त्यांना लिंकवर एक जाहिरात दिसून आली. त्यावर त्यांनी क्लिक केले असता, त्यांना समोरील एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने तुम्ही अॅमेझॉनवर ज्या वस्तू खरेदी करत आहात, त्याच्यावर तुम्हाला थेट २० टक्के सूट देण्यात येईल. ही सवलत अॅमेझॉनचे कमिशन वगळले गेले असल्याने मिळणार असल्याचे सांगितले. तसेच, खरेदीवर एक आकर्षक गिफ्टही दिले जाणार आहे. असे प्रलोभन दाखवले. यामुळे त्यांनी अॅमेझॉनवर खरेदी केलेल्या 33 हजारांच्या वस्तू त्याच्याकडून खरेदी केल्या. यासाठी त्याला ऑनलाइन पद्धतीने 33 हजार रुपये पाठवले. यानंतर समोरील व्यक्तीने कॉल करुन पैसे मिळाले नाहीत, पुन्हा वर्ग करा म्हणत पुन्हा 33 हजार देण्यास सांगितले. यानंतर त्यांना 33 हजार बिल झाले असून, ते पाठविण्यास सांगत त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेतले. तीन वेळा पैसे पाठवल्यानंतर रॉबीन यांनी अगोदर दिलेले 66 हजार रुपये रिफंड करण्यास सांगितले. यावर समोरील व्यक्तीने तुमच्या पत्नीचे बॅंक खाते असेल तर, त्याची माहिती द्या, त्यावर रिफंड पाठवतो असे सांगितले. रॉबिन यांनी त्याप्रमाणे पत्नीचे बॅंक डिटेल्स पाठवले. पुन्हा समोरील व्यक्तीने खात्यात किती पैसे आहेत, असे विचारल्यावर रॉबिन यांनी 13 हजार रुपये असल्याचे सांगितले. यानंतर त्यांने रॉबिन यांना फोनवर आलेल्या ओटीपी विचारला. ओटीपी मिळताच त्याने रॉबिन यांच्या पत्नीच्या खात्यातीलही 13 हजार रुपये काढून घेतले. आरोपीने त्यांना वेगवेगळ्या चार ते पाच बँक खात्यात ही रक्कम ऑनलाइन पध्दतीने वर्ग करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करत आहेत.