पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जिल्हा कृती समितीची सोमवारी (दि. ७ डिसेंबर) पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचवण्यात येईल, असा निर्णय झाला. इथून पुढे आठवड्यातून एकदा कृती दलाची बैठक घेण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांनी भारताच्या औषध महानियंत्रकाकडे (डीसीजीआय) कोरोना प्रतिबंधक लस आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितल्या आहेत. त्याच अनुषंगाने लवकरच केंद्र सरकारकडून लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले. या समितीने १२ डिसेंबरच्या आत कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते.
जिल्हा आरोग्य विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार, पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना २८ दिवसांच्या फरकाने लशीचे प्रत्येकी दोन डोस देण्यात येतील. या निर्णयाचा जिल्ह्यातील ३१ हजार ९१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षिका, परिचारिका आणि आरोग्य विभागातील लेखनिक, वॉर्ड बॉय यांचा समावेश असेल.