पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दोघे चांगले मित्र. त्यामुळे मित्राची अडचण लक्षात घेऊन त्यांनी आलेल्या ई मेलप्रमाणे १ लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर केले. काही दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमात भेटले. तेव्हा अर्थात ई मेलचा विषय निघाल्यावर मित्राने आपण असा काही ई मेल पाठविलाच नाही व आपण तर पुण्यातच होतो. तुर्कीला कधी गेलोच नाही, असे सांगितल्यावर निवृत्त एअर मार्शल यांना आपली सायबर चोरट्याने फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी निवृत्त एअर मार्शल सुनील श्रीपाद सोमण (वय ६४, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हे निवृत्त एअर मार्शल पत्नीसमवेत परदेशात गेले असताना ९ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. सायबर चोरट्याने त्यांचा एक मित्र अजित आपटे याच्यासारखाच ई मेल आयडी तयार केला व त्यांना पाठविला. त्यात त्यांच्या मित्र म्हणतो की मी सध्या बांधकाम काढले आहे. परंतु, बँकेत सहीचा प्रॉब्लेम झाला आहे. मी सध्या तुर्कीला आहे. बांधकामासाठी एक लाख रुपये द्यायचे आहेत़ तु आता दिले तर मी पुण्यात परत आल्यावर पैसे परत करतो़ असे या ई मेलमध्ये म्हटले होते़ हे निवृत्त एअर मार्शलही परदेशात असल्याने त्यांनी अधिक चौकशी न करता त्यात सांगितलेल्या बँक खात्यावर एक लाख रुपये ट्रान्सफर केले़ त्यानंतर ते भारतात परत आले.
काही दिवसांपूर्वी त्यांची या मित्राबरोबर एका कार्यक्रमात भेट झाली. तेव्हा या मित्राने आपण असा कोणताही ई मेल पाठविला नाही व कधीही पैसे मागितले नसल्याचे सांगितल्यावर त्यांना धक्का बसला. या प्रकरणात सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन सायबर चोरट्याचे बँक खाते व अन्य माहिती संकलित केली असून अधिक तपासासाठी हा गुन्हा कोंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे. निवृत्त एअर मार्शल हे स्वत: घटना घडली त्यावेळी परदेशात असल्याने व त्या ई मेलमध्ये संबंधित मित्राने आपण तुर्कीत असल्याचे सांगितल्याने त्यांचा प्रत्यक्ष संपर्क झाला नव्हता. त्यांनी मित्राचाच ई मेल असल्याचे गृहीत धरुन त्याच्याशी न बोलता पैसे पाठविल्याने सायबर चोरट्याचे फावले.