पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाऊनमध्ये भेकराईनगर येथे खून करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई युनिट-5च्या पथकाने सातारा जिल्ह्यातील कोरोगाव पोलीस स्टेशन हद्दीत केली.
जीवन गंगाराम कांबळे (वय 31, रा. उत्तमनगर, मंतरवाडी चौक, हडपसर), अनिकेत बालाजी सोनवणे (वय 22), विलास रघुनाथ पाटोळे (वय 28, दोघे, रा. कदमवाकवस्ती, पांडव दंड, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, शोएब शेख याचा पूर्ववैमनस्यातून 22 मे 2020 रोजी खून करून आरोपी फरार झाले होते. दरम्यान, टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपी सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास करून आरोपींना पकडले. त्यानंतर चौकशी केली असता मयत शोएब शेख याने जीवन कांबळे याच्यावर दीड वर्षापूर्वी हल्ला केला होता. त्याला धडा शिकविण्यासाठी मी साथीदाराच्या मदतीने शोएबवर कोयत्याने वार करून ठार मारल्याची कबुली दिली. सातारा पोलिसांनी मदत करून आरोपींना वेळेत पकडण्यासाठी मदत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे त्यांनी सांगितले.
अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रवीण शिंदे, भरत रणसिंग, सचिन घोलप, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, आश्रुबा मोराळे, दया शेगर, अंकुश जोगदंड, प्रमोद गायकवाड, संजय दळवी, महिला पोलीस शिपाई स्नेहल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.