Pune Crime News | खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या गुन्हेगाराला पकडून वारजे पोलिसांनी जप्त केले गावठी पिस्टल व जिवंत काडतुस

पुणे : Pune Crime News | खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या गुन्हेगाराला पिस्टल बाळगल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ४० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Warje Malwadi Police)
सागर अनिल मुंडे Sagar Anil Munde (वय २१, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सागर मुंडे याच्यावर २०२१ मध्ये तो कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न दाखल करण्यात आला होता.
वारजे माळवाडी परिसरातील रामनगर, गोकुळनगर परिसरात वाहन जाळपोळ, तोडफोडीच्या घटना व गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सूचना दिल्या होत्या. ४ जुलै २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौर्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या प्रभावी उपाय योजनांचा अवलंब करण्यात येत असताना संपूर्ण तपास पथक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या गुन्हेगारांच्या मागावर होते.
२ जुलै रोजी पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांना बातमी मिळाली की, कर्वेनगर येथील डी पी रोडवर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. बातमीनुसार, पोलिसांनी डी पी रोडवर जाऊन त्याचा शोध घेतला असता एक जण संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर मुंडे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सागर मुंडे याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून गेली ६ महिने तो हे पिस्टल बाळगून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वारजे माळवाडी पोलिसांनी गेल्या ६ महिन्यात ४ अवैध पिस्तुले जप्त केली आहेत. तसेच ७ कोयते व तत्सम धारदार शस्त्रे जप्तीच्या कारवाया केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, बालाजी काटे, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव यांनी केली आहे.