Pune Crime News | पुणे: चौकशीसाठी बोलावून महिलेला पोलीस ठाण्यात ‘थर्ड डिग्री’ टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 9 जणांवर FIR

June 14, 2024

पुणे :  – Pune Crime News | पुण्यामध्ये पोलिसांकडून एका महिलेला थर्ड डिग्री टॉर्चर (Third Degree Torture) दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेला अमानुषपणे मारहाण केली, त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. हा प्रकार 23 मार्च 2023 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) घडला आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय पिडीत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.13) फिर्याद दिली आहे. यावरुन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर (वय-50), महिला पोलीस हवालदार निलम सचिन कर्पे, माया तुकाराम गाडेकर, योगिता भानुदास आफळे, एक अनोळखी महिला पोलीस शिपाई, अनोळखी पुरूष पोलीस कर्मचारी, अक्षय जीवन आवटे (वय-31 रा. सोमवार पेठ), आदित्य गौतम (वय-30 रा. साततोटी गणेश मंडळ, कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 354(ब), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आवटे हा महिलेचा पती आहे. महिलेने पतीच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार केली आहे. याचा राग मनात धरुन आरोपी पती व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी ‘हिला आतमध्ये घ्या’ असे सांगितले.

त्यानंतर महिला पोलीस हवालदार माया गाडेकर, योगिता आफळे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यातील एका खोलीत घेऊन गेले. त्याठिकाणी महिलेचे काहीही ऐकून न घेता पाच जणांनी कंबरेच्या पट्ट्याने, लाथा बुक्क्या व ठोशांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांच्यापैकी एकाने अक्षय अवटे, आदित्य गौतम व सुजित पुजारी हे एका राजकीय पुढाऱ्याची माणसे आहेत. ते जीवे ठार मारतील असे म्हणाले. तर सुजीत पुजारी याने याबाबत तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली. पती अक्षय याने अश्लील बोलून फिर्यादीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत.