Pune Crime News | पुणे : विरोधी गँगशी संबंध ठेवल्याने वर्गमित्रावर पिस्तुलच्या मुठीने मारहाण; आठ जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

December 13, 2024

पुणे : Pune Crime News | सांगूनही विरोधी गँगशी संबंध ठेवल्याने एका गुंडाने आपल्या साथीदारांसह जाऊन आपल्या वर्गमित्रावर पिस्तुल रोखले़ पिस्तुलाच्या मुठीने डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

याबाबत नागेश सदाशिव तळगडी (वय २३, रा. सदानंदनगर, न्यू मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पवन राकेश करताल, यश टिळेकर, फैजल खान, अभिजित खेत्रे, कुणाल पोळ, योगेश साळुंके व अन्य दोघे यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश आणि पवन करताल हे लहानपणापासून वर्गमित्र असून पवन अधुनमधून खर्चासाठी नागेश यांच्याकडून पैसे घेत असायचा. त्याचेविरुद्ध गुन्हे दाखल होऊ लागल्याने नागेश याने त्याच्याशी बोलणे बंद केले. नागेश यांचे कसबा पेठेत राहणारे जुने मित्र साहिल, मयुर, आर्यन यांच्याशी बोलत जाऊ नकोस, ते माझ्याविरुद्ध पार्टीचे आहेत, असे पवन याने नागेश याला सांगितले होते. त्यावेळी त्याने पवन याला मी कोणासोबतही फिरेल, तुला काय करायचे असे बोलले होते. त्यावर त्याने फिर्यादी यांना बघुन घेण्याची धमकी दिली होती. बालपणीचा मित्र असल्याने नागेश यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

फिर्यादी यांचा मित्र चैतन्य वाघ याला २ हजार रुपयांची आवश्यकता होती. त्यासाठी फिर्यादी यांनी त्याला घराखाली बोलवले होते. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता वाघ सदा आनंदनगरच्या इमारती खाली आल्यावर फिर्यादीही खाली आले. तेव्हा त्यांचा मित्र शाहीद याला काही जण मारत होते. फिर्यादी खाली आल्यावर पवन करताल याने ‘‘ तुला सांगितले होते ना कसब्यातील पोरांसोबत राहत नको जाऊ, तुला माझे सांगणे कळत नाही का, ’’ असे बोलून कमरेला लावलेले पिस्तुल फिर्यादीच्या डोक्याला लावून तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणून पिस्तुलाचे मुठीने डोक्यात जोरजोरात मारले. हे पाहून त्याच्या साथीदाराने त्यांच्या तोंडावर, नाकावर, जोरजोरात लाथाबुक्क्यांनी मारले. नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आई, मावशी, मित्र शाहरुख खान हे त्यांना सोडविण्यासाठी आले. त्यावेळी पवन याने हवेत पिस्तुल फिरवून ‘‘मी इथला भाई आहे, माझ्या नादाला कोणी लागला तर मी कोणाला जिवंत सोडणार नाही,’’अशी धमकी दिली. शाहरुख यास पिस्तुल दाखवून तू मध्ये आला तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. फिर्यादी हे आई सोबत रिक्षाने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना १५ ऑगस्ट चौक येथे पवन करताल याने तक्रार द्यायची नाही, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव तपास करीत आहेत.