Pune Crime News | दसर्याचा कार्यक्रम पाहणार्या महिलांना भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केला अदखलपात्र गुन्हा
आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार : पोलीस उपायुक्त संभाजी कदम
पुणे : Pune Crime News | कर्वेनगर येथील शहीद चौकात दसर्याचा कार्यक्रम पाहत असणार्या महिला, तरुणींना कारण नसताना तिघा टोळभैरवांनी शिवीगाळ केली. याची पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हे टोळभैरव पुन्हा आले व त्यांनी पुन्हा शिवीगाळ केली. तेव्हा महिलांनी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. भर रस्त्यात महिलांशी असे वागणार्या या तिघांविरुद्ध वारजे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्यांना सोडून दिले.
कर्वेनगरमधील दत्त मंदिराजवळील शहिद चौकात गुरुवारी रात्री साडेदहा वाजता हा प्रकार घडला.
ओमकार राठोड, बालाजी मलठणकर व ओमकार मलठणकर (तिघे रा. गल्ली नं. १, कर्वेनगर) अशी या तिघा टोळभैरवांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती.
कर्वेनगर येथील शहीद चौकात दसऱ्याचा कार्यक्रम सुरु होता. तो पहात तक्रारदार व इतर महिला, तरुणी उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन हे तिघे टोळभैरव आले. त्यांनी काही एक कारण नसताना सरसकट शिवीगाळ करु लागले. त्याला तक्रारदार व अन्य महिलांनी प्रतिबंध केला. याचा राग आल्याने त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी जमलेल्या लोकांनी समजावून त्यांना परत पाठवून दिले. त्यानंतर ओमकार राठोड व बालाजी मलठणकर हे पुन्हा आले. तक्रारदार यांनी पोलिसांना कळविले आहे, याचा राग आल्याने त्यांनी तक्रारदार व इतर तरुणींना शिवीगाळ केली आहे. महिलांनी या दोघांना पकडून वारजे पोलिसांच्या हवाली केले. महिलांनी वारजे पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. वारजे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, या घटनेबाबत महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार त्याची नोंद केली आहे. महिलांबरोबर त्यांचे वकीलही उपस्थित होते. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत.



Comments are closed.