Pune Crime News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून खडक पोलिसांनी जप्त केले गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुस

पुणे : Pune Crime News | मारामारी तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला खडक पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ५६ हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.
साहील मजिद खान Sahil Majid Khan (वय २८, रा. घोरपडे पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे़ त्यावर यापूर्वी २०२४ मध्ये मारामारी आणि ऑर्म अॅक्टखाली दोन गुन्हे दाखल आहेत.
खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, साहील खान याच्याकडे पिस्टल असून तो एकबोटे कॉलनीमध्ये उभा आहे. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांची आणि त्याची नजरानजर होताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा पोलिसांनी काही अंतर पाठलाग करुन त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे मॅगझीनसह पिस्टल व खिशात जिवंत काडतुस मिळून आले. खडक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे यांच्या सुचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, विश्वजित गोरे, योगेश चंदेल, निलेश दिवटे, शोएब शेख, मयुर काळे, विकास पांडळे यांनी केली आहे.