Pune Crime News | शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमध्ये मद्यपी टोळक्याने स्पिकर लावून अर्धनग्न अवस्थेत घातला गोंधळ; पोलीस अंमलदाराला केली धक्काबुक्की
पुणे : Pune Crime News | शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमध्ये मद्यपी टोळक्याने पहाटेच्या सुमारास स्पिकर लावून अर्धनग्न अवस्थेत डान्स करत गोंधळ घातला. यावेळी त्यांना समजाविण्यास गेलेल्या मार्शल पोलीस अंमलदाराला त्यांनी धक्काबुक्की केली़ पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणून सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार अक्षय डिंडोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नाना बापू नाईकनवरे (वय २४), सनी मुकेश नाईकनवरे (वय २२, दोघे रा. एसआरए वसाहत, विमाननगर), दक्षेश विठ्ठल कुरपे (वय २४, रा. सरगम सोसायटी, वारजे जकात नाका), गणेश संजय तुपसौंदर (वय २२, रा. कुंभारवाडा चौक, कसबा पेठ), विकी कारंडे (वय २४, रा. बराटे चाळ, कर्वेनगर), सार्थक कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण पूर्वी कामगार पुतळा वसाहतीत रहात होते. येथील झोपडपट्टीतील लोकांचे पूर्नवसन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. शनिवारी रात्री हे सर्व जण शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमध्ये एकत्र आले होते. रात्रीभर त्यांनी तेथे मद्यपान केले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांनी मोठमोठ्या आवाजात स्पिकर लावून अर्धनग्न अवस्थेत डान्स करण्यास सुरुवात केली. पोलीस मार्शल अक्षय डिंडोरे हे गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. ते तेथे गेले. त्यांनी आरोपींना गोंधळ घालू नका, असे सांगितले. तरीही त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ करुन हाताने धक्काबुक्की केली. आईवरुन शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तपास करीत आहेत.


