Pune Crime News | एकट्या राहणार्‍या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Crime News | ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरुन तिच्या तोंडावर उशी दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) त्याला अटक केली आहे. विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०, रा. नेपाळ) असे या चोरट्याचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Attempt To Murder)

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला गणेश पेठेत (Ganesh Peth Pune) एकट्याच राहतात. त्यांची मुलगी विवाहित असून, ती धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विश्वकर्मा गणेश पेठेतील महिलेच्या घराजवळ आले. पावसामुळे दरवाजा खराब झाल्याने महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता. कोणी नसल्याचे पाहून विश्वकर्मा घरात शिरला. ज्येष्ठ महिला झोपेत होत्या. विश्वकर्माने महिलेच्या तोंडावर उशी दाबली. महिलेने विरोध करून आरडाओरडा केला. रहिवाशांनी त्वरीत या घटनेची माहिती दिली. गणेश पेठ पोलीस चौकीतील कर्मचार्‍यांनी तेथे धाव घेतली. विश्वकर्माला ताब्यात घेतले.

विश्वकर्मा फिरस्ता असून, तो सध्या सदाशिव पेठेत राहायला असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे (PSI Amol Kale) तपास करत आहेत.