Pune Crime News | अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवसात 2 कारवायांमध्ये पकडला 26 लाखांचा आफिम आणि मेफेड्रॉन (Video)
पुणे : शहर गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी दोन पथकाने एकाच दिवसात दोन कारवायांमध्ये तब्बल २६ लाख २८ हजार रुपयांचा आफिम आणि मेफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ पकडला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व पोलीस अंमलदार हे ५ जुलै रोजी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे यांना बातमी मिळाली की, भैरवनाथ मंदिरामागील संत कृपा बिल्डिंगसमोर एक जण थांबला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन एकाला पकडले. भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून १४ लाख ९८ हजार रुपयांचा ७४९ ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ मोबाईल, हँड बॅग, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा १५ लाख ४ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
दुसरी कारवाई बिबवेवाडी भागात ५ जुलै रोजी करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस अंमलदार हे बिबवेवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझीम शेख यांना बातमी मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याला पकडले. त्याच्या ताब्यातून ११ लाख २ हजार रुपयांचे ५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ २ हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मोबाईल असा ११ लाख २४ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवके मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेबाड यांनी केली आहे.



Comments are closed.