Pune Crime News | मंदिरात आलेल्या तरुणाला गुंडाने माझ्या एरियात यायचे नाही, म्हणत डोक्यात दगड मारुन केले गंभीर जखमी, वारजे माळवाडी येथील म्हसोबा मंदिरातील घटना
पुणे : Pune Crime News | मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या तरुणाला गुंडाने माझ्या एरियात यायचे नाही, असे म्हणून तरुणाच्या डोक्यात दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार वारजे माळवाडी येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या पाठीमागील म्हसोबाचे मंदिरात रविवारी साडेपाच वाजता घडला.
याबाबत शुभम दिलीप झोंबाडे (वय २५, रा. वांजळे कॉम्प्लेक्सशेजारी, उरीटनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरज श्रीमंत दहिरे (वय २७, रा. कारगिल बिल्डिंगशेजारी, वाराणसी सोसायटी, वारजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सुरज दहिरे हा सराईत गुंड असून त्याच्यावर २०१८ पासून गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणी उकळणे, आर्म अॅक्ट, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे अशा विविध कलमाखाली चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०२१ मध्ये मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम झोंबाडे हे वारजे माळवाडी येथील म्हसोबा मंदिरात देवाचे पाय पडण्यासठी गेले होते. त्यावेळी सुरज दहिरे तेथे आला. त्याने शुभम याला ‘‘मी इथला भाई आहे. तू येथे का आलास, तुला मस्ती आली का, माझ्या एरियात यायचे नाही’’ असे म्हणत आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. शुभम झोंबाडे याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. शुभम तेथून जात असताना तेथील दगड उचलून शुभम याच्या डोक्यात दोनदा मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा तपास करीत आहेत.



Comments are closed.