पुणे : बहुजननामा ऑनलाईन – चारित्र्याच्या संशयावरून वाद झाल्यानंतर आपल्या गावी चाललेल्या पत्नीला पतीने संगम ब्रीज पुलावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जखमी झाली आहे. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
बसम्मा नागप्पा कुंभार (वय 30, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती नागप्पा शिवप्पा कुंभार ( वय 37) याला अटक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून नागप्पा हा त्याची पत्नी बसम्माच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्याच्यात सतत वाद सुरू होते. भांडणात तो लहान मुलींना देखील मारहाण करत असे. तर पत्नीला देखील मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून बसम्मा त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात आली होती. पण, तिला गाडी न मिळाल्याने ती पुन्हा घरी निघाली. त्यावेळी आरोपी हा संगमब्रीज येथील न्यायाधीश बंगाल्याजवळ आला. त्याने पत्नीसोबत त्या ठिकाणी वाद सुरू केले. चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे मारहण्याची धमकी देऊ लागला. वाद सुरू असताना आरोपीने रागाच्या भरात बसम्मा हिला पुलावरून नदी पात्रात ढकलून दिले. त्या ठिकाणी असलेल्या जमीनीवर पडल्यामुळे तिला जखम झाली. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीला अटक केली. तर या घटनेत बसम्मा या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.