Pune Crime News | बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न करणारा गजाआड ! जामनगरच्या तरुणाकडे आढळल्या ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा

December 23, 2024

पुणे : Pune Crime News | बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १४२ बनावट नोटा तसेच १०० रुपयांच्या ६१ बनावट नोट्या अशा एकूण ७७ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. (Fake Currency Detection)

गौरव रामप्रताप सविता Gaurav Rampratap Savita (वय २४, रा. डिफेन्स कॉलनी, जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार लखन गंगाधर शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडला.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते (PI Umesh Gite) यांनी सांगितले की, पोलिसांना एका दुकानदाराने शुक्रवारी रात्री माहिती दिली की, भाजी मार्केट येथे एका जणाकडे नोटा असून त्या बनावट असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका मेडिकल दुकानाच्या बाहेर थांबलेल्या गौरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. त्याचबरोबर त्याच्याकडे २ हजार ६५० रुपयांच्या १९ खर्‍या नोटाही सापडल्या. तो जामनगर येथे हेल्पर म्हणून काम करतो. शुक्रवारीच तो पुण्यात आला होता. त्याने या नोटा कोणाकडून घेतले़ त्याच्याकडे कशा आल्या, याचा तपास करण्यात येत आहे. तपासासाठी न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.