Pune Crime Court News | गणेश काळे यांचा खुन करणार्या तिघा आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी; तिघेही सराईत गुन्हेगार, कोंढवा पोलिसांनी 2 पिस्तुले केली जप्त
पुणे : Pune Crime Court News | रिक्षाचालक गणेश काळे याच्यावर गोळीबार करुन त्याच्यावर कोयत्याने वार करुन निर्घुण करणार्या तिघा आरोपींना न्यायालयाने पोलीस तपासासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
अमन मेहबुब शेख (वय २३, रा. काकडे वस्ती, कोंढवा), मयुर वाघमारे (वय २३) आणि अरबाज अहमद पटेल (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गणेश काळे हे खडी मशीन येथील भारत पेट्रोल पंपावर असताना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास २ मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन निर्घुण खुन केला होता. कोंढवा पोलिसांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली़ एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या तिघा आरोपींना सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी न्यायालयात सांगितले की, बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्या सांगण्यावरुन या तिघांनी गणेश काळे याचा निर्घुण खुन केला. खुन केल्यानंतर त्यांनी एक मोटारसायकल तेथेच टाकून ते कात्रज मार्गे खेड शिवापूरला पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन त्यांचा माग काढून त्यांना पकडले. त्यांच्याकडून २ पिस्तुले जप्त केली आहेत. अरबाज पटेल या सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर एमपीडीए अर्तंगत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती.
मयुर वाघमारे याच्यावर यापूर्वी २ गुन्हे दाखल असून अमन शेख याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता, मोटारसायकल जप्त करायची आहे. त्यांना गणेश काळे याचा खुन करण्यास कोणी सांगितले. या गुन्ह्यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे़, याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांनी आरोपींकडून अजून काही जप्त करायचे नाही, त्यामुळे २ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने तिघांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.


