Pune Crime Branch News | पिंपरीतील तडीपार गुंडाला पुण्यात खंडणी विरोधी पथकाने केले अटक

November 30, 2024

पुणे : Pune Crime Branch News | पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्तांनी (Pimpri Chinchwad Police) तडीपार केले असतानाही पुण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार मुसा टोळीतील प्रमुखाला खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) जेरबंद केले आहे. (Tadipar Criminal Arrested)

मुसा ऊर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२, रा. नूर मौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. मुसा टोळीविरुद्ध भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी, दिघी, आळंदी, चाकण, एमआयडीसी महाळुंगे पोलीस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे टोळीप्रमुख मुसा याच्यासह त्याच्या टोळीतील दोघांवर तत्कालीन पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये २ वर्षांसाठी मुसा याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.

खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी, पोलीस अंमलदार मयूर भोकरे हे फरारी आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा हवालदार अमोल आव्हाड व मयूर भोकरे यांना भोसरीतील तडीपार गुन्हेगार मुसा हा शास्त्री रोडवरील बैजू हॉटेल येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या बातमीची खातरजमा करुन मुसा थोरपे याला पकडले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक फौजदार रवींद्र फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी यांनी केले आहे.