पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक असणारा पोलिसांचा बनावट ई-पास करून देणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. धनाजी गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभाव आणि एकूणच परिस्थिती पाहता शासनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक केली आहे. त्यासाठी एक वेबसाईट तयार केली असून, covid-19mhpolice@gov.in या वेबसाइट अर्ज करावा लागतो. पोलीस पडताळणी करून योग्य कारण असल्यास पास देतात. मात्र, फुरसुंगीच्या धनाजी गंगनमले हा बनावट ई-पास देत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी फुरसुंगी येथील पापडे वस्तीत राहत असलेल्या धनाजी याच्या घरी छापा टाकला. त्यात बनावट पासची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. तो राहत्या घरातच बनावट पास बनवण्याचे काम करत होता. त्याने पोलिसांच्या वेबसाईटवरूनच ई-पास तयार केला होता. त्या खऱ्या ई-पासच्या मजकुरात फेरफार करून तो बनावट पास बनवत होता. तसेच, त्या पासवर महाराष्ट्र पोलिसांच्या बोधचिन्हाचा वापरही करत होता. त्यानंतर त्या पासची विक्री केली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक निरीक्षक जुबेर मुजावर, उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलिस नाईक इरफान पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.