पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील विविध शहरातील कुस्तीचे मैदान गाजवलेला आणि सातारा केसरी पैलवानाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. नवनाथ ऊफ बापूर बाबासाहेब शेलार (वय ३४, रा. मु़ पो. नांदोशी, ता़ हवेली) असे या पैलवानाचे नाव आहे. त्याच्याकडून ४१ हजार रुपयांचे एक गावठी पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी पोलीस नाईक संदीप साबळे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वडगाव धायरी येथील अलका पोकळे यांच्या घरासमोर एक जण कमरेला पिस्तुल लावून थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक व त्यांचे सहकारी तातडीने वडगाव धायरी येथे पोहचले.
त्यांनी तेथे थांबलेल्या नवनाथ शेलार याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल व दोन काडतुसे आढळून आली. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.