पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील प्रभा हाऊसिंग सोसायटीमधील मोकळा भुखंड स्वत: चा असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक केली. तसेच खऱ्या जमिन मालकाविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसंत ठाकर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी किशोर गांधी व किशोर आलाटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
किशोर गांधी यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेत किशोर गांधी आणि किशोर आलाटी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. किशोर गांधी यांच्या वतीने ॲड. प्रसाद निकम आणि ॲड. तन्मय देव यांनी युक्तीवाद केला. अर्जदार यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून ते पूर्णपणे निर्दोष आहेत. संबंधित गुन्हा हा कागदोपत्री असून जमिनीचे कागदपत्र अर्जदारांकडे असल्याचा युक्तिवाद ॲड. निकम आणि ॲड. देव यांनी न्यायालयात केला. त्यांचा युक्तीवाद मान्य करुन न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला.
काय आहे प्रकरण ?
प्रभा हाऊसिंग सोसायटीमध्ये मोकळा भूखंड आहे. हा भूखंड किशोर गांधी यांच्या ताब्यात आहेत. मात्र हा भूखंड आपल्या मालिकीचा असल्याचे वसंत ठाकर यांनी दावा केला आहे. तर वसंत ठाकर यांनी गेट तोडून त्याठिकाणी आपल्या संस्थेची वाहने पार्क करुन भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा गांधी यांनी केला आहे. तसेच 15000 चौ. फूटाचा प्रभा सोसायटी सोबत भाडेपट्टा करार झाला असताना 23000 हजार चौ. फुट असे सांगून स्वत:च्या व सोसायटीच्या नावे सर्व क्षेत्र असल्याचे कोर्टाला भासवले. तसेच गांधी व आलाटी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने ठाकर यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून कोथरुड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर कोथरुड पोलिसांकडून चौकशीसाठी फोन आल्यानंतर किशोर गांधी यांनी न्यायालयात याप्रकरणी दाद मागून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.