‘त्या’ मभागांवर कारवाई करण्याची क्रिएटिव्ह फाऊंडेशनची मागणी, पोलिस करणार कडक कारवाई

coronavirus-big-relief-no-more-corona-outbreaks-maharashtra-experts-says-exact-reason

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना त्रास न होणारे कोरोना रुग्ण मात्र विलगीकरणात न राहता बिनदक्त बाहेर फिरत असून, या महाभागावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाईचे पत्र क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना दिले आहे. शहराच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अश्या परिस्थितीत प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. पण, कोरोनाचे काहींना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरात आजपासून दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी आहे. तर हॉटेल्स, मॉल, पीएमपी बस सेवा 7 दिवसासाठी बंद केली आहे.

शहरात एकीकडे रुग्ण वाढ होत आहे. पण अनेकजण नियम पाळत नसून, अनेक सुजाण नागरिक कोरोनाग्रस्त असतानाही सोसायटीच्या आवार तसेच इतरत्र मुक्तपणे संचार करत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी. तर, अनेक नागरिक हे आवश्यकता नसतानाही रुग्णालयात दाखल होत आहेत. तसे दिसून आले असून, केंद्रीय पद्धतीने प्रवेश होत नसल्याने खऱ्या गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांनाऑक्सिजनची गरज आहे, अश्या रुग्णांची अडचण होत आहे. तर ज्यांना निमोनिया झाला आहे, त्या रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्याची गरज आहे. पण त्यांना बेड मिळत नसल्याचे खर्डेकर यांनी म्हंटले, आहे.

तर दुसरीकडे आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्यांचे रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवसांचा वेळ लागतो. या कालावधीत संबंधित व्यक्ती सक्तीने गृह विलगीकरणात रहात नसून, ते अधिक धोकादायक आहे. त्यांच्यामुळे अन्य नागरिकांना कोरोना होऊ शकतो. त्यामुळे पूर्वी रिपोर्ट येईपर्यंतचे असणारे विलगीकरण केंद्र सुरु करावे.
तर गेल्या वेळी ज्याप्रमाणे विलगीकरण केंद्र सुरु केले होते. तसेच यावेळीही विलगीकरण सुरु करावे. तसेच काही वृत्तपत्रात फोटो पाहिल्यास लसीकरण केंद्रातही नागरिक अगदी जवळ जवळ बसले दिसत असून, त्याठिकाणी देखील सुरक्षित अंतर राखण्याबाबत योग्य सूचना द्याव्यात, असे या पत्रात म्हंटले आहे.

खर्डेकर यांनी हे पत्र विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले असून, यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, खर्डेकर यांनी केलेल्या मागणीची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून पोलिस अशा महाभागांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.