पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन आता न्यायालयात नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार कोर्टाचे कामकाज आता 2 शिफ्टमध्ये करण्यात आले आहे. तसेच ज्यांच्या खटल्याची सुनावणी आहे, अशानांच न्यायालय परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. उच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमावलीचा आधारे हा निर्णय घेतला आहे.
याबाबत बार असोसिएशनची बुधवारी (दि. 24) बैठक पार पडली. त्यात ही नियमावली लागू केली आहे. त्यानुसार, न्यायालयीन कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार आहे. यात पहिली शिफ्ट सकाळी 10.30 ते 1 आणि दुसरी शिफ्ट 1ः 30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहील. न्यायालयीन कामकाज करताना न्यायाधीश वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी नसतील तर विरुद्ध आदेश पारित होणार नाही. न्यायालय परिसरात वकील, साक्षीदार, आरोपी आणि व्यक्तीश: काम चालवणारे पक्षकार, ज्यांच्या तारखांची डेली बोर्डवर नोंद असेल अशांना प्रवेश दिला जाणार आहे. कोर्ट हॉलमध्ये जोपर्यंत पुकारले जात नाही, तोपर्यंत कोणीही आत मध्ये प्रवेश करावयाचा नाही. तसेच कामकाज संपल्यानंतर संबधित वकिलांना न्यायलय परिसरात न थांबण्याची विनंती बार असोसिएशनने केली आहे.